सुशिक्षित बेरोजगारांना फसविणाऱ्यांवर गुन्हा दाखल, दोघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 02:22 AM2019-08-11T02:22:56+5:302019-08-11T02:23:15+5:30
सुशिक्षित बेरोजगारांच्या चारचाकी गाड्या ३० हजार रु पये महिना या प्रमाणे भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून त्या गाड्या परस्पर अन्य ठिकाणी गहाण ठेवून फसवणूक करणा-या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
पनवेल - सुशिक्षित बेरोजगारांच्या चारचाकी गाड्या ३० हजार रु पये महिना या प्रमाणे भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून त्या गाड्या परस्पर अन्य ठिकाणी गहाण ठेवून फसवणूक करणा-या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी ८३ लाख ८० हजार रु पयांच्या ६३ चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
चौक, हातनोली येथील प्रदीप रामचंद्र देशमुख (वय २६ वर्षे) यांनी घरगुती वापराकरिता सप्टेंबर २०१८ मध्ये ट्रु व्हॅल्यू कार डीलरकडून मारुती सुझुकी इर्टिगा कार क्र . एमएच ०३ बी एस ६६८६ ही कार पाच लाख ८० हजार रुपयास विकत घेतली होती. गाडी भाड्याने लावण्यासाठी ते सतीश म्हसकर याला भेटले. या वेळी सतीश व अन्य एका इसमाने त्यांना त्यांच्या कार्यालयात नेले. त्या दोघांनी सदरचे कार्यालय हे त्यांचेच असल्याचे सांगितले. सतीश म्हसकर याने त्यांची गाडी प्रतिमहिना ३० हजार रुपये भाड्याने पनवेल ते नेरे अशी चालविण्याकरिता देण्याचा प्रस्ताव मांडला, तसेच गाडीचे भाडे महिना झाल्यानंतर तिसºया दिवशी मिळेल व महिन्यातून एकदा गाडी वापरावयास मिळेल, असे सांगितले. १८ जून २०१९ रोजी ठरल्याप्रमाणे दोघांच्यात नोंदणीकृत अॅग्रिमेंट झाले आणि त्याच दिवशी ती गाडी व गाडीचे ओरिजनल कागदपत्र देशमुख यांनी सतीश म्हसकर याच्या ताब्यात दिली. त्यानंतर म्हसकर यास देशमुख यांनी पैशांसाठी वारंवार संपर्क केला; परंतु त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ३ आॅगस्ट रोजी देशमुख यांना गाडीचे भाडे मिळाले नाही म्हणून ते सतीश म्हसकर याच्या पनवेल येथील कार्यालयात गेले असता त्यांना त्याच्या कार्यालयात बरेच लोक जमलेले दिसले.
या वेळी सतीश म्हसकर याने या सर्व लोकांच्या गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून त्या गाड्या जयेश, (रा. खारघर), सुरजीत अण्णा, (रा. सानपाडा) यांच्याकडे गहाण ठेवल्या असल्याचे समजले. त्यानंतर देशमुख यांनी जयेशकडे फोनवर संपर्क साधला असता सतीश म्हसकर यांनी त्याच्याकडे गाड्या तारण ठेवून प्रत्येक गाडीचे लाख-दीड लाख रुपये घेतले असल्याचे देशमुख यांना सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे देशमुख यांना समजताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
शहर पोलिसांनी वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, विश्वास बाबर, ईशान खरोटे वत्यांच्या पथकाने आरोपी सतीश पांडुरंग म्हसकर (३१, जाताडे, रसायनी) व शाहरु ख शहानवाज बेग (२५, मोमीनपाडा, पनवेल) या दोघांना ताब्यात घेतले. डिसेंबर २०१८ पासून दोघांनी गाड्या भाड्याने लावण्याच्या या व्यवसायाला सुरु वात केली होती.
तीन जिल्ह्यांतील तरुणांना फसविले
यातील आरोपी सतीश म्हसकर व शाहरु ख बेग हे मित्र आहेत. सतीश याला काही महिन्यांपूर्वी पैशांची गरज असल्याने त्याने आपली गाडी नातेवाइकांकडे दीड लाख रु पयांत गहाण ठेवली व पैसे आल्यावर गाडी सोडवून नेतो, असे सांगितले. या प्रकारातून त्याला गाडी गहाण ठेवण्याचा व्यवसाय करण्याची कल्पना मिळाली. त्याने त्याचा मित्र शाहरु ख याला सोबत घेऊन मित्र, नातेवाईक यांच्या गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून ‘घेऊन ये, त्या बदल्यात काही रक्कम मिळेल’ असे आमिष दाखिवले.
त्यानुसार मित्र व ओळखीच्या लोकांकडे जाऊन चारचाकी गाड्या महिना ३० हजार रु पयेप्रमाणे कॉल सेंटर, ट्रॅव्हल्स, कंपनीमध्ये लावतो, असे सांगून गाड्या व त्यांचे कागदपत्र त्यांनी घेतली व त्यांच्यासोबत अॅग्रिमेंट बनविले. काही महिने गाडीमालकांना महिन्याला पैसे मिळत होते. मात्र, चार महिन्यांपासून पैसे देणे बंद झाल्याने गाडीमालकांनी त्याच्या कार्यालयात जाऊन पैशांची विचारणा केली असता त्यांच्या गाड्या अन्य ठिकाणी गहाण ठेवल्या असल्याचे त्यांना समजले. त्यांनी गाड्या व पैसे मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला.
मूळ मालकांच्या गाड्या इतर ठिकाणी गहाण ठेवून दोघा आरोपींनी ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. यातील गाडीमालक बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग येथील आहेत. यातील शाहरु ख बेग या आरोपीवर यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात २५ लाख रु पये चोरी केल्याचा गुन्हा २०१८ मध्ये दाखल आहे. तर सतीश म्हसकर याचा केबलचा व्यवसाय असून तो इस्टेट एजंटचा व्यवसाय करत होता. दोघांनाही न्यायालयाने १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.