फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या दोघांना कर्नाटकामधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 08:34 PM2018-11-07T20:34:33+5:302018-11-07T20:35:22+5:30
३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर क्राईम सेलने कर्नाटकामधून अटक केली.
पुणे : फायनान्स कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन ई एमआय कार्डधारका मोबाईल क्रमांक बदलून त्या कार्डाद्वारे अॅमेझॉन व फ्लिपकार्ट वर आॅनलाईन शॉपिग करुन ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर क्राईम सेलने कर्नाटकामधून अटक केली. विकास सोमशेखर (वय २६, रा़ टुमकूर, कर्नाटक) आणि संजू शशीकुमार (वय २५, रा़ टुमकूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत,हा प्रकार २२ मे ते २६ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान झाला होता.
याप्रकरणी हेमंत अहिरराव (रा़ कात्रज) यांनी फिर्याद दिली होती़ अहिरराव हे बजाज फिनसर्व कंपनीमध्ये नोकरीला आहेत़ कंपनीच्या ग्राहकांच्या संदर्भाने झालेल्या अपहाराची चौकशी करण्याचे काम करतात. २२ मे ते २६ आॅक्टोंबर दरम्यान एकाने बजाज फिनासर्व फायनान्स कंपनीचे कस्टमर केअरला फोन करुन त्यांच्याकडे असलेल्या ईएमआय कार्डधारकाचे माहितीवरुन ग्राहक बोलत असल्याचे भासविले. कंपनीकडे रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक बदलून घेतला. त्या ग्राहकाच्य ईएमआय कार्डवरुन त्याने अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग साईटवर एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांची खरेदी केली. त्याचे बिल मुळ ग्राहकाला गेल्यावर ही फसवणूक उघड झाली होती. या गुन्ह्याचा सायबर क्राईम सेल समांतर तपास करीत होते. सायबर सेलद्वारे तांत्रिक तपासात दोघे आरोपी बंगलुरु व टुमकुर या ठिकाणी हे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, पोलीस शिपाई शिरीष गावडे, नितेश शेलार, भुषण शेलार या पथकाने जाऊन बंगलुरु व टुमकुर येथे तपास केला. त्यात दोघे जण भाड्याने घर घेऊन रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरावर ३ नोव्हेंबरला छापा घालून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५ मोबाईल, १४ सिमकार्ड, ७ एटीएम कार्ड, १ लॅपटॉप असा ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दोघांना अटक करुन अधिक तपासासाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.