तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक : हिंजवडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:32 PM2019-08-01T18:32:26+5:302019-08-01T18:54:36+5:30
पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वषार्साठी तडीपार गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
हिंजवडी : पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वषार्साठी तडीपार गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या विविध घटनांचा तपास करत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई- बेंगळुरू महामार्गावर भुमकर चौक शनिमंदिर येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
सतीश साहेबराव सावंत (वय ३०, रा. गणेशनगर, थेरगाव) तसेच विकास संभाजी तनपुरे (वय २०, रा. थेरगाव) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तीन महिन्यांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी मिळून भुमकर चौक ते शनिमंदिर रोड दरम्यान दुचाकीवरून येऊन पहाटे पादचाऱ्यास अडवून दहशत निर्माण करत महागडा मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती. यामधील विकास तनपुरे यास यापूर्वी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. मात्र तो तडीपार मुदतीत पुणे शहरात वास्तव्य करून विविध गुन्हे करत होता. ताब्यात घेतलेल्या सराईतांकडे कसून चौकशी केली असता हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजून तीन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून ७५ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल फोन, चार हजार रुपये रोख, स्टिलचा चाकू असा ७९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, महेश वायबसे, बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, रितेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.