ऑटोमोबाइल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 11:44 PM2020-12-06T23:44:49+5:302020-12-06T23:46:57+5:30
Crime News : हा प्रकार १९ ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला.
ठाणे - ठाण्यातील साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. यातील अरोरा याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर रांका याला १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पुष्पक रांका याने त्याची पत्नी रश्मी रांका तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीचे व्यवस्थापक विधी अरोरा आणि त्यांची पत्नी रूपाली कदम या चौघांनी मिळून साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांनीही या कंपनीमध्ये एका कंटेनरमधून आलेल्या १९ लाखांच्या ४० दुचाकींची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून विमा कंपनीकडून साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीला विम्यापोटी दिले जाणारे कमिशनही परस्पर लाटले. कमिशन आणि ४० दुचाकी मिळून सुमारे ४२ लाख ५० हजारांचा अपहार केल्याची तक्रार साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीच्या वतीने विनोद शेट्टी (३८) यांनी ७ नोव्हेंबर रोजी दाखल केली. हा प्रकार १९ ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी पुष्पक रांका, रश्मी रांका, विधी अरोरा आणि रूपाली कदम या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.