ठेकेदाराला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:44 PM2018-11-14T20:44:14+5:302018-11-14T20:48:48+5:30
लुल्लानगर येथे राहणाऱ्या २७ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर रोजी घडला़.
पुणे : बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरविणाऱ्या ठेकेदाराला २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़.
मनीष रमेश चावडा (वय ३४, रा़ रास्ता पेठ) आणि तेजस विकास भोर (वय २१, रा़ भोरवाडी, वडगाव, चांडिला, ता़ जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी लुल्लानगर येथे राहणाऱ्या २७ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर रोजी घडला़. या तरुणाबरोबर १० वषार्पूर्वी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्राचा मनीष चावडा हा भाऊ आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तरुणाचा गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरविण्याचा व्यवसाय आहे़. ते दिवाळीनिमित्त नागपूरला गेले असताना त्यांना एका मोबाईलवरुन फोन आला व त्याने तुमची रुपारी दिली आहे़. २५ लाख रुपये दिले नाही तर जीवे मारु अशी धमकी दिली़. त्यानंतर ते दोन दिवस वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकी देणारे फोन करण्यात येत होते़ ते पुण्यात आल्यावरही हे फोन येत होते़. त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती़. त्यामुळे घाबरुन त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या तरुणाने आपण इतके पैसे देऊ शकत नाही, असे सांगून १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली़. त्यानुसार १३ नोव्हेंबरला रात्री त्यांनी रस्ता पेठेतील शाहू उद्यानजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले़. त्यानुसार हा तरुण बनावट नोटांचे बंडल घेऊन तेथे पोहचला़. यावेळी पैसे घेताना तेजस भोर याला पोलिसांनी सापळा रचून पकडले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला मनीष चावडा याने सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी चावडा यालाही अटक केली़.
मनीष चावडा याचा भाऊ संदीप चावडा हा या तरुणाबरोबर दहा वर्षांपूर्वी वडगाव येथील सिंहगड इस्टिट्युट येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शिकत होते़. त्यामुळे तो त्याला व मनीष चावडा याला ओळखत होता़.
पुढील तपासासाठी दोघांना खडक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी महेश कदम, प्रमोद मगर, धिरज भोर, मंगेश पवार, अमोल पिलाणे यांनी केली आहे़.