पाकिस्तानच्या क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठाण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 08:38 PM2022-02-06T20:38:13+5:302022-02-06T20:38:39+5:30
Cricket Betting Case : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, पेशावर झल्मी आणि कराची किंग यांच्यातील सामना
ठाणे : पाकिस्तानातील पेशावर झल्मी आणि कराची किंग या दोन संघांमधील ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीरपणो सट्टा खेळणाऱ्या धीरेन ठक्कर आणि भव्या वीरा या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत मिळाली आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील नटवर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये क्रिकेटवर सट्टा खेळला जात असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र घोलप यांना मिळाली होती. त्याच आधारे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश जाधव आणि हवालदार नितीन ओवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमधील एका खोलीतून धिरेन ठक्कर आणि भव्या वीरा यांच्यासह तिथेच टीव्ही पाहणार दोन महिलाही तिथे आढळल्या. त्यावेळी टीव्हीवर पाकिस्तान सुपर लीग २०२२ चे २०-२० हे क्रिकेटचे सामने सुरू होते.
कराची किंग्जविरुद्ध पेशावर झल्मी या दोन संघामध्ये हे सामने सुरू होते. त्यावेळी आपण क्रिकेटवर बेटिंग खेळत असल्याची कबुलीही पोलिसांना दिली. हा व्यवसाय मोबाइल फोनवर रोखीने केला जातो. त्यासाठी लागणारे लोटस आणि डायमंड मोबाइल ॲप्लिकेशन हे पूर्वी प्रवीण बेग याच्याकडून ते घेत होते. सध्या हे ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड केतन भाई याच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेट बेटिंगच्या व्यवसायमध्ये आम्ही हिशोबाप्रमाणे रोख रक्कम देत असतो. या महिला मैत्रिणी असून, त्या केवळ भेटण्यासाठी आल्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचाही त्यांनी दावा केला. त्यांच्याकडून २० हजारांचे तीन मोबाइल जप्त केले आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ५ मे रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे.