मोबाईलसह दुचाकी जबरीने चोरी करणाऱ्या दुकलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 08:21 PM2023-05-19T20:21:11+5:302023-05-19T20:21:42+5:30
मुद्देमाल हस्तगत, गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कामगिरी
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकी स्वाराकडून मोबाईलसह दुचाकी जबरीने चोरी करणाऱ्या दुकलीला गुरुवारी मुंब्रा येथून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे.
सोमेश्वर नगर, आई चंडिकां चाळ येथे राहणाऱ्या राजमंगल संतलाल सिंग (३२) हे १२ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास चिंचोटी ब्रिजजवळ जैन मंदिराच्या पुढे दुचाकीवरून जात असताना लघुशंका आली म्हणून रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून उभे होते. यावेळी दोन चोरांनी त्यांना पकडून ठेवत खिशातील दोन मोबाईल, दुचाकीची चावी व रोख रक्कम असा ६८ हजाराचा मुद्देमाल चोरी करून ते दुचाकी घेऊन पळून गेले होते. नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार हे तात्काळ वरिष्ठांचे आदेशाने घटनास्थळी भेट देवून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज प्राप्त करून चोरटयांचा पळुन जाण्याचा मार्गाचा शोध घेतला.
बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपी अभिषेक दिलीप त्रिपाठी आणि जाफर उर्फ सलमान अमीर अली खान या दोघांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने गुरुवारी झैनबिया, मुंब्रा येथुन ताब्यात घेण्यात आले. गुन्हयातील आरोपीचे अंगझडतीत जबरीने चोरलेले व्ही.वो. कंपनीचे २ मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकुण ६६ हजार रुपये किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, संतोष चव्हाण यांनी केली आहे.