बेकायदेशीर अग्निशस्त्र साठा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत
By अजित मांडके | Published: April 23, 2024 03:16 PM2024-04-23T15:16:30+5:302024-04-23T15:17:02+5:30
४ पिस्टल, ४ गावठी पिस्टल, १ मॅगझीन आणि २२ काडतुसे जप्त
ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणी विरोधी पथक व विषेश कृती दल, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठ्यासह अटक केली आहे. शंभु महतो नावाचा इसम अवैध अग्निशस्त्र, काडतुसे आणि गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी येथे सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ४ पिस्टल, २ गावठी कट्टे, १ मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे असा ३ लाख ४० हजार रुपये किमंतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत गुन्हे शाखा घटक पाच पोलिसांनी देखील एकाला दोन गावठी पिस्टल व चार काडतुसासह अटक करण्यात आले आहे.
अटक आरोपी शंभु महोता (३५) रा. टागोर नगर विक्रोळी, मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. १८ एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना सहायक पोलीस निरिक्ष सुनील तारमळे व पोलीस उपनिरिक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे महतो हा साकेत रोड, राबोडी येथे अवैध शस्त्रसाठा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याने हा अग्निशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात महतो हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरोधात रबाळे पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे खूनाचा गुन्हा दाखल असुन तो जामीनावर बाहेर असल्याचे आढळून आले आहे.
अटक आरोपीला २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या एका घटनेत गुन्हे शाखा घटक वागळेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे २२ एप्रिल पोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांच्या सुमारेस नटवर हॉटेलससमोर रोड नं. २२ वागळे इस्टेट या ठिकाणी शेरबहादुर नवबहादुर कारकी रा. चंदीगड हा अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार काडतुस जप्त करण्यात आले आहेत. हे पिस्टल त्याने कोठून आणले होते व कोणास विक्री करणार होता, याचा तपास केला जात असल्याची माहिती घोडके यांनी दिली.