उल्हासनगर महापालिकेचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देणारे रॅकेट, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:35 PM2021-08-02T20:35:26+5:302021-08-02T20:36:24+5:30
Crime News : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका उपायुक्त व अन्य एका अधिकाऱ्यांच्या बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. अश्या किती तरुणांना नोकरीच्या नावाखाली फसविले हे उघड होणार असुन तरुणांनी अश्या रॅकेट पासून सावध राहण्याचे आवाहन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केले.
उल्हासनगर महापालिका विद्युत विभागातील वायरमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र एक तरुणाला दिल्याचा प्रकार एका महिन्यापूर्वी उघड झाला होता. नियुक्तीपत्र महापालिका मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे व सहायक आयुक्त सासे यांच्या बनावट सहीचे होते. तसेच एका महिला कर्मचाऱ्याला वैधकीय कारण दाखवून बनावट वैधकीय सेवा निवृत्तीचे पत्र दिल्याचा प्रकार उघड झाला. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी अश्या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मध्यवर्ती पोलिसांनी नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करून कैलास शेकडे याच्यासह दोघाला अटक करून सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी दिली. तसेच त्यांच्याकडून मोठे घबाळ मिळण्याची शक्यता असून नोकरीच्या नावाने किती तरुणाला फसविले. हेही तपासात उघड होण्याचे संकेत पोलिसांनी दिले.
महापालिकेत सन २००३ साली नोकरी भरती झाल्यानंतर, मोठी नोकर भरती झाली नाही. मात्र महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या बनावट सहीने नियुतीपत्र देण्याचे प्रकार घडत आहेत. अश्या रॅकेटचा पर्दापाश झाल्याने, त्यांच्याकडून मोठी माहिती मिळून किती तरुणांना आतापर्यंत फसविले. हेही उघड होणार आहे. अनुकंपातत्वावर नोकरी, वारसहक्काने नोकरी, थेट नोकरी आदी प्रकार झाले का? याचाही तपास पोलीस करणार आहेत. यापूर्वी महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बनावट कागदपत्रांचा प्रश्न नेहमी ऐरणीवर आला. त्यानंतर तो का? गुंडाळण्यात आला? कारवाई का झाली नाही. आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. यानिमित्ताने त्यांची चौकशी झाल्यास अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार लटकण्यात येणार असल्याचे बोलले जाते.
मोठे मासे अडकण्याची भीती?
महापालिका उपयुक्तांच्या सहीचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याचा प्रकार उघड होऊन, याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र यामागे महापालिकेतील मोठे मासे कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच बनावट कागदपत्र देऊन महापालिकेत नोकरीला लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे यानिमित्ताने होत आहे.