बँक फ्रॉडप्रकरणी हैदराबादहून दोघांना २५ लाखासह अटक; सुधीर भटेवरा फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:16 AM2021-03-21T03:16:18+5:302021-03-21T03:16:34+5:30
१३ जणांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, अनघा मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेतली असून, दोन्ही ठिकाणांवरुन ७ हार्डडिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे.
पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याच्या डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी हैदराबादहून आणखी दोघांना अटक केली. दरम्यान, ज्याच्या घरासमोर पोलिसांनी २५ लाखासह तिघांना पकडले होते, तो सुधीर भटेवरा हा फरार झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. लक्ष्मीनारायण गुट्टू ऊर्फ सोन्या (वय ३२, रा. बौद्धनगर, हैदराबाद) आणि व्यंकटेश सुब्रम्हण्यम उपाला (वय ४०, रा. भांदलागुंडा, नागोल, हैदराबाद), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी अनघा मोडक हिच्या मोबाईल फोनच्या माहितीचे एक्सट्रॅक्शन केले असता, त्यातील संभाषणामध्ये सर्व आरोपींचा उल्लेख व त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आढळून आले आहे. रोहन मंकणी, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू आणि अनघा मोडक हे सर्व जण १० व १२ मार्च रोजी नवी पेठेतील सॅफरॉन हॉटेलमध्ये एकत्र आले होते. त्यांनी तेथे बराच वेळ थांबून चर्चा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली, त्याची माहिती घ्यायची आहे.
अनघा मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेतली असून, दोन्ही ठिकाणांवरुन ७ हार्डडिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे. या लॅपटॉपचा तिने गुन्ह्यासाठी वापर केला आहे का? या गुन्ह्यात एका बँकेतील एक खाते व अन्य बँकेतील तीन खात्यांची माहिती संबधित बँकेने सादर केली असून, त्या खात्यांमध्ये २०९ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यातील पैसे आरोपी हे कोणत्या प्रकारे हॅक करून त्यातील रक्कम ही एका बँक खात्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या खात्यावर कशाप्रकारे ट्रान्सफर करणार होते, याचा तपास करायचा आहे.
शिल्लक खात्यांची माहिती आली कामी
लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममीडी (रा. हैदराबाद) यांच्या व्हॉटस्अॅपवर २५ कोटी ७७ लाख ७८ हजार ९०८ रुपये तसेच दुसऱ्या व्हॉटस्अॅपवर ३ कोटी ५ लाख ६० हजार ३५५ रुपयांच्या किमतीची शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती पाठविल्याचे मिळून आले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने सर्वांना अधिक तपासासाठी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.