ठाण्यात दागिने लंपास करणारे दोघे अटकेत, १७ लाख २८ हजारांचा ऐवज हस्तगत
By अजित मांडके | Published: April 13, 2024 03:32 PM2024-04-13T15:32:31+5:302024-04-13T15:33:41+5:30
या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ठाणे : बाजारपेठ, सार्वजनिक रस्त्यांवर लोकांना बोलण्यात गुंतवून, बतावणी करुन त्यांची फसवणुक करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून लंपास करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटने अटक केली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील १६ गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. तर त्यांच्याकडून १७ लाख २८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल शेट्टी (३३) आणि रमेश जयस्वाल (४७) दोघेही रा. मंलगगड रोड, भालगाव, अंबरनाथ अशी आहेत. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक रस्ता अशा ठिकाणी नागरिकांना बोलण्यात गुंतवून भामटे त्यांच्याकडील दागिने लंपास करीत असल्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. याप्रकरणी नौपाडा, उल्हासनगर, बदलापुर पुर्व, शिवाजीनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, डोंबिवली तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु आरोपी गुन्ह्याची आणि राहण्याची जागा सातत्याने बदलत असल्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नव्हते.
या प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने सुरू केला होता. या पथकाने तपास करून अनिल आणि रमेश या दोघांना अटक केली. या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयात केलेल्या ११ गुन्ह्यातील १७ लाख २८ हजारांचा ऐवज दोघांकडून जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.