पुण्यातील खून प्रकरणी दोघांना लातुरात अटक; सासवड-दिवेघाटात फेकून दिला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:56 PM2018-08-29T19:56:59+5:302018-08-29T21:35:29+5:30
पुणे येथील एका कार चालकाचा खून करुन मृतदेह २७ आॅगस्ट रोजी रात्री सासवड-दिवेघाटात फेकून देऊन त्याच्या कारची विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या दोघांना लातूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारसह अटक केली.
लातूर : पुणे येथील एका कार चालकाचा खून करुन मृतदेह २७ आॅगस्ट रोजी रात्री सासवड-दिवेघाटात फेकून देऊन त्याच्या कारची विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या दोघांना लातूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारसह अटक केली.
पोलिसांनी सांगितले, पुण्यातील खराडी येथील कार पार्इंटवरुन उबेर टॅक्सी (एम. एम. १२ एन. बी. ३८२०)आरबाज उर्फ मज्जू अमीन शेख (२३), समीर कासीम शेख (३० रा. शिराळा ता. कुर्डूवाडी जि. सोलापूर हल्ली मुक्काम फुरसंगी ता. हवेली जि. पुणे) यांनी भाड्याने ठरविली. दरम्यान, कारचालकाला २७ आॅगस्ट रोजी रात्री करमाळा येथे जायचे असे सांगण्यात आले होते. फुरसंगी गावच्या रेल्वेगेटनजीक कार चालक विजय देवराव कापसे (४०, रा. उमापूर ता. गेवराई, ह.मु. विमान नगर, पुणे) यांचा गळा आवळून व दगडाने डोक्यात मारहाण करण्यात आली. यामध्ये ते बेशुद्घ पडले. त्यांना कारच्या डिक्कीत कोंबण्यात आले. रात्रीच्या वेळी ही कार सासवड घाटाकडे सुसाट निघाली अन् दिवेघाटात ही कार थांबविण्यात आली. डिक्कीतून कारचालकाला काढून पुन्हा दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये कारचालक कापसे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मृतदेह जंगलात फेकून ही कार लातूरच्या दिशेने निघाली. दरम्यान, या कारची लातुरात विक्री होणार असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिग्नल कॅम्प परिसरात सापळा लावला. यावेळी पांढ-या रंगाची कार दाखल झाली. या कारसह पोलिसांनी आरबाज उर्फ मज्जू अमीन शेख आणि समीर कासीम शेख याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या घटनेला कलाटणी मिळाली. कारचालकाचा खून करुन त्याच्या ताब्यातील कार विक्रीसाठी आपण लातुरात आणली होती, अशी कबुली त्या दोघांनी दिली.
पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि लक्ष्मण कोमवाड, पोहेकॉ अंगद कोतवाड, गोरख शिंदे, खुर्रम काझी, संपत फड, युसूफ शेख, भागवत कठारे, भिष्मानंद साखरे, सोनटक्के यांचा समावेश होता.
पैशासाठी ठेचून खून केला; आरोपींची कबुली
आरबाज हा कर्जबाजारी असून, तो एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. कर्जबाजारीपणामुळे तो गेल्या काही दिवसापासून त्रस्त होता. यातून आपली सुटका व्हावी, यासाठी त्याच्यासह चुलतभावाने एक शक्कल लढविली. कार भाड्याने घेण्याचा बहाणा करुन, कारचालकाचा खून करण्यात आला. त्या कारची विक्री करायची अन् मिळणारे पैसे वाटून घ्यायचे. हा कट त्यांनी गेल्या काही दिवसांपासून रचला होता. यातून कारचालक विजय कापसे यांचा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.