छोटा शकीलच्या नावाने धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:01 PM2019-11-22T21:01:24+5:302019-11-22T21:03:25+5:30
पोलीस कोठडीत रवानगी
मुंबई - छोट्या शकीलच्या नावाने जोगेश्वरीतील एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला धमकावणाऱ्या दोघांना ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आमीर खान उर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार वसीम अजित खान हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून ते जोगेश्वरी येथील गुलशन नगर परिसरात राहतात. त्यांची खाजगी कंपनी असून कंपनीद्वारे घराची डागडुजी, रंगरंगोटी,लाद्या बसविणे, दरवाजा उघडणे,वॉल टाईल्स तसेच सुतार काम करण्याचे काम करण्यात येत होते. या कामासाठी कंपनीत सहा कर्मचारी काम करीत होते. त्यावेळी आरोपी आमीर खान उर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके यांनी आरटीआय कार्यकर्ते असल्याचे सांगून तुम्ही महापालिकेची परवानगी घेतली का असा सवाल करून काम बंद पाडू असे धमकावले. अमीर याने आपण छोटा शकील टोळीसाठी काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर आक्टोबर महिन्यात पुन्हा फोनवर धमकावून पैशाची मागणी केली. पैसे नाही दिले तर हातपाय तोडू अशी धमकी दिली. इतकेत नव्हे तर छोटा शकीलला दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली होती. त्यावेळेस तक्रारदाराने २२ हजार रुपये रोख देऊन सुटका केली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा ८० हजार रुपये घेतले. नोव्हेंबर महिन्यात तक्रारदारांचे अजित ग्लासमध्ये दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरु होते. यावेळीही अमीर आणि दिनेश आले. छोटा शकीलच्या खंडणीची रक्कम देत नसल्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
बांधकाम अनधिकृत असून त्याची तक्रार महापालिकेकडे करून बांधकाम तोडू असा दम दिला. त्यानंतर पुन्हा या दोन आरोपींनी महापालिकेत तक्रार न करण्यासाठी पैश्याची मागणी करत धमकावले. अखेर वारंवारच्या धमकीसत्राला कंटाळून तक्रारदार वसीम यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांना खंडणी घेताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी दोघांकडून एक फॉर्च्युनर कार, खंडणीची रक्कम आणि शस्त्र हस्तगत केले आहे. या दोन आरोपींची मागील तीन ते चार वर्षात छोटा शकीलच्या नावाने मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.