सराफाला दोन कोटीला लुटणाऱ्या दोघांना अटक, वसईतून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 03:21 AM2019-05-05T03:21:19+5:302019-05-05T03:21:36+5:30
सराफ मालकाचे हात-पाय बांधून सहका-याच्या मदतीने रोख रकमेसह साडेसहा किलो सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी ९० लाखांचा ऐवज लुटणाºया नोकरासह दोघा जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.
मुंबई - सराफ मालकाचे हात-पाय बांधून सहकाºयाच्या मदतीने रोख रकमेसह साडेसहा किलो सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी ९० लाखांचा ऐवज लुटणाºया नोकरासह दोघा जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. राणाराम खुमाराम पुरोहित उर्फ नरेश उर्फ रणवीर (२१, रा. खिलोडी, सितलवाना, राजस्थान), पुखराज शैतानराम भिल (२१, रा. बोली, चोतना, राजस्थान) अशी त्यांची नावे असून गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-५ च्या पथकाने त्यांना वसई परिसरातून शनिवारी सकाळी अटक केली.
दोघांनी बुधवारी भरदिवसा माहीममधील मोरी रोडवरील अभिषेक ज्वेलर्समधून हा ऐवज लंपास केला होता. राणाराम हा या दुकानात काही महिन्यांपासून खोटे नाव सांगून काम करत होता. दुकान लुटल्यानंतर ते वसईतील एका घरात लपून बसले होते.
अभिषेक ज्वेलर्समध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास राणारामने मित्राच्या साहाय्याने दुकान मालकाला मारहाण करून तोंडात बोळा घातला. त्यांचे हातपाय बांधून दुकानातील साडेसहा किलो सोने, साडेनऊ किलो चांदीचे दागिने, ७ लाख ८६ हजारांची रोकड, रिव्हॉल्वर, सहा काडतुसे घेऊन पलायन केले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट-५ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व परिसरातून माहिती घेतल्यानंतर नोकराने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तो वसईतील एका ठिकाणी लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार शनिवारी सकाळी त्यांना पकडले. उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखालील कक्ष-५ चे प्रभारी निरीक्षक अशोक खोत, निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव आदींनी आपल्या पथकासह या कारवाईत भाग घेतला.
राणारामने दुपारी दुकानात वर्दळ नसतानाची वेळ निश्चित करून काम फत्ते केले. मात्र चोरलेला माल जादा असल्याने तो सोबत घेऊन प्रवास करणे धोक्याचे असल्याने त्यांनी वसईत थांबून माल विकण्याचे प्रयत्न केले होते, मात्र मोठ्या प्रमाणात दागिने असल्याने त्यांना योग्य गिºहाईक भेटत नव्हते, त्याच दरम्यान पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला.