महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 08:50 PM2019-12-02T20:50:20+5:302019-12-02T20:53:07+5:30
सहा लाखाचे ५८ मोबाईल जप्त
मुंबई - मुंबईपोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने दोन सराईत परप्रांतीय चोरट्यांना अटक करून वेगवेगळ्या कंपनीचे पाच लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ मोबाईल जप्त केले. मन्सूर सुलेमान (वय ३०, रा. निखलहड्डी ता. पुत्तुर जि दक्षिण कन्नड ,कर्नाटक ) व इब्राहिम मोईदीन (२५, रा. वसवगडी मजेश्व्रर ,केरळ ) अशी त्याची नावे असून मुंबईसह मंगळूर कर्नाटकातूनही त्यांनी गुन्हे केली आहेत. चोरलेल्या मोबाईलचे आयएमआय क्रमांक बदलून त्याची विक्री करीत होते, असे पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण -१) अकबर पठाण यांनी सांगितले.
मानखुर्द येथील रिक्षा स्टॅन्डजवळ काहीजण चोरीतील मोबाईल विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती गुन्हा अन्वेषण कक्ष-६ चेंबूर येथील सहाय्य्क आयुक्त महेश तोरसकर यांना खात्रीदायक खबऱ्याकडून मिळाली. त्याच्या सूचनेनुसार पथकाने परिसरात पळत ठेवली होती. संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. बॅगेची झडती घेतली असताना त्यांच्यकडे विविध कंपनीचे ५८ मोबाईल मिळाले. मोबाईल चोरल्यानंतर ते सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याचा आयएमआय क्रमांक बदलले होते. दोघांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील तसेच अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे, असे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.