जैन मंदिरात मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:06 AM2021-08-25T09:06:41+5:302021-08-25T09:06:51+5:30
वालीव पोलिसांची कारवाई. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसईच्या सातीवली येथील जैन मंदिरात ३१ डिसेंबर २०२० रोजी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास देवांच्या ११ मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोरीची घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणी वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देवांच्या मूर्ती चोरणाऱ्या नवी मुंबईच्या नेरुळ येथे राहणारे दोन आरोपींना सोमवारी अटक केली आहे.
वसईच्या सातीवली येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. ३१ डिसेंबरच्या पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील पाच लाख रुपये किमतीच्या दोन चांदीच्या व नऊ पंचधातूंच्या अशा देवांच्या ११ मूर्तींची चोरी केली होती. या चोरीची घटना कळल्यावर वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाल्याने सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने नवी मुंबईच्या नेरुळ येथे राहणारे सुभाष केवट (३५) आणि राजू वंजारी (३०) या दोन आरोपींना सोमवारी अटक केली आहे.
दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या दोन्ही आरोपींकडून अजून देवांच्या मूर्ती मिळाल्या नसून त्या बिहारमध्ये असल्याचे सूत्रांकडून कळते.