ठाण्यात मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या स्पा चालकासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 08:16 PM2021-12-05T20:16:22+5:302021-12-05T20:19:46+5:30
Crime News : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सध्या महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.
ठाणे - शहरातील कासारवडवली भागात स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली काही असाहाय्य महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या स्पा चालकासह दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी रविवारी दिली. या दोघांच्या तावडीतून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सध्या महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. अशातच घोडबंदर रोडवरील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कासारवडवली येथील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या एका स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवून या स्पा चालकासह दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २० ते २५ वयोगटातील पाच पीडित महिलांची सुटका केली आहे.
पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हे काम करून घेतले जात होते. स्पा चालक ग्राहकांकडून दोन ते चार हजारांपर्यंत पैसे घेत होता. यातील काही रक्कम या पीडित महिलांना देऊन त्यांची बोळवण केली जात होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी काही आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.