आंतरराज्यीय सोनसाखळी व बॅग खेचणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिताफीने अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:01 PM2024-06-15T18:01:44+5:302024-06-15T18:02:10+5:30
भांडुपच्या टेंभी पाड्यातील विश्वकर्मा सदन येथे राहणाऱ्या निवेदिता केगडे (४२) या ३ जूनला दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जावेच्या आईचे ऑपरेशन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी नालासोपाऱ्याच्या सिद्धिविनायक नगर येथील अमेय अपार्टमेंटच्या येथे रिक्षाने उतरल्या.
मंगेश कराळे
आंतरराज्यीय सोनसाखळी व बॅग खेचणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी शुक्रवारी शिताफीने अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
भांडुपच्या टेंभी पाड्यातील विश्वकर्मा सदन येथे राहणाऱ्या निवेदिता केगडे (४२) या ३ जूनला दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जावेच्या आईचे ऑपरेशन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी नालासोपाऱ्याच्या सिद्धिविनायक नगर येथील अमेय अपार्टमेंटच्या येथे रिक्षाने उतरल्या. त्या रिक्षातून उतरून मुलीसह पायी जात असताना दोन आरोपींनी त्यांच्या गळ्यातून एक लाख रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरून नेले होते. नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी खेचण्याच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून आरोपींचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
गुन्हयाचा समांतर तपासा दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत आरोपीत निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरुन आरोपी आशिष कुमार ऊर्फ होलु ऊर्फ भदोरीया राजकुमार भातु (३८) आणि अमित कुमार प्रदिप कुमार (३६) या दोघांना शुक्रवारी मिरा रोड व मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींनी अशाच प्रकारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात आणखी सोनसाखळी व बॅग खेचण्याचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुनील पाटील, सुमित जाधव, आतिश पवार, मनोज तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.