लातूरमध्ये पिस्तुल, जिवंत काडतुसांसह दाेघांना अटक; एक जण फरार
By राजकुमार जोंधळे | Published: November 18, 2022 11:57 PM2022-11-18T23:57:56+5:302022-11-18T23:58:29+5:30
साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, लातुरातील कन्हेरी चाैक परिसरात तीन जण माेटारसायकलवरून संशयास्पद फिरत आहेत.
लातूर : पिस्तुल, जिवंत काडतुसे, माेटारसायकल, तीन माेबाइल आणि राेकडसह दाेघांना लातुरातील कन्हेरी चाैकात पाेलिस पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. एक जण फरार झाला आहे. त्यांच्याकडून जवळपास ५ लाख ५३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील कन्हेरी चाैक परिसरात तीन जण माेटारसायकलवरून संशयास्पद फिरत आहेत. त्यांच्याकडे पिस्टल, जिवंत काडतुसे असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस अधिकाऱ्याला दिली. या माहितीच्या आधारे विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी पाळत ठेवत माेठ्या शिताफीने तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यातील दाेघे पाेलिसांच्या हाती लागले तर एक पळून जाण्यात यशस्वी ठरला. अटकेत असलेल्या दाेघांकडून माेटारसायकल, पिस्टल, जिवंत काडतुसे, तीन माेबाइल, राेख रक्कम असा एकूण ५ लाख ५३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दाेघांपैकी एक जण औसा तालुक्यातील कवठा गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ताे सध्याला लातुरात प्रकाशनगर भागात वास्तव्याला आहे. तर एक जण उदगीर तालुक्यातील असून, ताे सध्याला माताजीनगर भागात राहत असल्याचे समाेर आले आहे.
याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या एकाचा शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे, असे पाेलिसांनी सांगितले.