दिवसभरात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर दोन हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:28 PM2019-12-20T21:28:32+5:302019-12-20T21:30:55+5:30
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसावर हल्ला; संघटनांचे वाद मुंबईच्या रस्त्यावर
मुंबई - विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यावर पवई येथे हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीवन कामत असं हल्ला केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
जीवन कामत हे शिवसेनेचे गोवा संपर्कप्रमुख व भारतीय कामगार सेनेचे चिटणीस असून कामत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेषत: शिवसेनेच्याच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जीवन कामत यांच्यावर गुरुवारी माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जीवन कामत यांनी पवई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. संशयित आरोपींची माहितीही पोलिसांना दिल्याचे सांगितले. दरम्यान, या हल्ल्यात कामत यांच्या चालकालाही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेमध्ये वाद सुरू होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन बैठकाही केल्या होत्या. त्यातून सलोख्याने हा वाद मिटवण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. मात्र, माथाडी कामगारांमधील या वादातून धुसफुस सुरूच होती. त्यातून हा वाद इतका पेटला की गुरुवारी थेट माथाडी कार्यकर्त्यांनी कामत यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी दुपारी पवईतील रेनायसन्स हॉटेलजवळ गावात हा हल्ला करण्यात आला. गाडी पळवल्यामुळे ते बचावले. दरम्यान, हल्ल्यात कामत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीच्या डावा बाजूच्या खिडकीच्या समोरील काच फोडण्यात आल्या. सुदैवाने त्यात कामत बचावले.