ताम्हिणी घाटात एका कारमध्ये आढळले जळालेले दोन मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:35 IST2019-07-05T13:34:24+5:302019-07-05T13:35:13+5:30
पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरी जवळ कार जळालेल्या अवस्थेत सापडली

ताम्हिणी घाटात एका कारमध्ये आढळले जळालेले दोन मृतदेह
पौड : मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील पिंपरी गावाच्या हद्दीत एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील दोन मृतदेह सापडले होते. पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरीजवळ कार जळालेल्या अवस्थेत सापडली. गाडीमध्ये २ जळालेले मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पौडपोलिसांना ३ जुलैला दिली होती. ही घटना दोन तीन दिवसांपूर्वीच घडली असल्याचा अंदाज आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सापडलेले मृतदेह ९० टक्के जळालेले असून विजय आबा साळुंके (वय ३५, बांदा, जि.सिंधुदुर्ग), विकास विलास गोसावी ( वय ३२, निपाणी, जि. कोल्हापूर) अशी मयतांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी व्यक्त केली आहे .
या दोघांची हरवल्याची तक्रार माणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. हे दोन्ही तरुण ता. ३० रोजी घरात संपर्क करून फिरायला जात असल्याचे सांगून गेले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. या भागात सतत पडत असलेल्या पावसामुळे जळालेली कार व सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आला नव्हता. घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम धोंडगे, अनिल लवटे,सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, सचिन गायकवाड, लियाकत मुजावर, अब्दुल शेख, शंकर नवले, संजय सुपे,जय पवार,मंगेश लांडगे, प्रशांत बुणगे, संदीप सकपाळ आदि तपास करत आहेत. दरम्यान तारीख ४रोजी पौड पोलिसांनी दुपारी पौड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.