पिंपरी परिसरात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:15 PM2019-05-17T17:15:04+5:302019-05-17T17:16:57+5:30
भोसरी व बावधन येथे घडलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला....
पिंपरी : भोसरी व बावधन येथे घडलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडलेल्या घटनेत चोरट्याने ४ लाख ६४ हजार ४०० रुपये किंमतीचा ऐवज लपास केला. याप्रकरणी शांताराम धोंडिबा चोरघे (वय ६५, रा. सेक्टर क्रमांक, १, प्लॉट नं. ३६७, लक्ष्मीकुबेर बंगला, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ते १६ मे या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरघे यांच्या राहत्या बंगला बंद होता. दरम्यान, बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तसेच कुलूप, कडी-कोयंडा तोडून चोरटा आत शिरला. त्यानंतर बेडरुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तर दुसरी घटना बावधन येथे घडली. याप्रकरणी श्रीकांत मुकुंदराव भट (वय ३६,रा. बंगला क्रमांक ३६, रॉयल हिल्स सोसायटी, रिगालिया बिल्डिंग कंपाउंड, अरिहंत कॉलेजच्यामागे, उत्तमनगर, बावधन बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ते १५ मे या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत भट यांचा राहता बंगला बंद असताना बेडरुममधील खिडकीचे गज कापून चोरटा आत शिरला. त्यानंतर कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.परी परिसरात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास