मुंब्रा भागातून अपहरण झालेली दोन मुले सापडली माटुंगा बालगृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 09:45 PM2022-06-08T21:45:01+5:302022-06-08T21:45:12+5:30
पालकाच्या केले स्वाधीन : ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने घेतला शोध
ठाणे : मुंब्रा येथून बेपत्ता झालेल्या अरबाज (१०) आणि अरफाद (१२) या दोन मुलांचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. या दोघांनाही आता त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली. ही दोन्ही मुले माटुंगा बालगृहात होती.
अरफाद आणि अरबाज ही दोन मुले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकात विना पालक बेवारसरीत्या आढळल्यानंतर त्यांना माटुंगा येथील बालगृहात ठेवल्याची माहिती या बालगृहाचे समुपदेशक तुषार रघुवंशी यांनी ४ जून २०२२ रोजी ठाण्याच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे हवालदार एच. एम. तळेकरला दिली होती. या दोघांच्याही पालकांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळाले नसल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले. मुंब्रा पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली. अमृतनगर येथून त्यांचे अपहरण झाल्याचेही या तक्रारीमध्ये पालकांनी म्हटले होते.
चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जमादार शंकर जाधव, श्यामराव कदम, हवालदार सुनील साळवी, हनुमंत तळेकर, सुधाकर चौधरी, तेजश्री शिरसाठ आणि संगीता कांबळे यांच्या पथकाने या मुलांच्या पालकांचा मुंब्य्रातील अमृतनगर भागात शोध घेतला. या मुलांच्या आईचा चार वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. इमान खान (३९) हे त्यांचे वडील असल्याची बाब चौकशीमध्ये समोर आली.
फोटोवरून ही दोन्ही मुले आपलीच असल्याचेही त्यांनी ओळखले. खात्री झाल्यानंतर पोलीस हवालदार सुनील साळवी यांनी माटुंगा येथील बालगृहाचे समुपदेशक रघुवंशी यांना व्हिडिओ कॉल करून त्याद्वारे मुले आणि वडिलांची भेट घडवून आणली. तेव्हा ही मुले त्यांचीच असल्याची खात्री पटली.
बेपत्ता झाल्याचे कारण अस्पष्ट
चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मुंबईच्या डोंगरी येथील बालकल्याण समितीकडे कागदपत्रांची पूर्तता करून या दोन्ही मुलांना ठाण्याच्या बालकल्याण समितीशी समन्वय करून पालक आणि मुलांची भेट घडवून आणली. या दोघांनाही ६ जून २०२२ रोजी त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही मुले मुंब्रा येथून कशी बेपत्ता झाली, याची माहिती मात्र त्यांना देता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.