अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली; अंधार पडल्याने शोधकार्य थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 08:30 PM2021-11-14T20:30:10+5:302021-11-14T20:30:43+5:30
Drowning Case : शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले.
अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणात रविवारी दुपारी दोन लहान मुले बुडाल्याची घटना घडली आहे. या मुलांचा रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यानंतर अंधार पडल्याने ही शोध मोहीम बंद करण्यात आली.
सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावे असून ते अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला आहेत. शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या आणि हुकच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र दिवसभर शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नाहीत. अखेर अंधार पडल्याने आजचे शोधकार्य थांबवण्यात आले असून सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.