परळ येथे बसचालकाच्या पत्नीसह दोन मुलांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 02:34 PM2019-02-27T14:34:59+5:302019-02-27T14:35:20+5:30
महिलेने मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली
मुंबई - परळ येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कामेरकर कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल सकाळी राहत्या घरी रेवती कामेरकर (३७) या महिलेने मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तसेच १६ आणि ४ वर्षाच्या मुलांना विष दिले. या तिघांचे मृतदेह शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरातून पोलिसांनी बाहेर काढले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेस्टचे चालक म्हणून काम करणारे संदीप कामेरकर हे काल सकाळी ८ वाजता नोकरीसाठी निघाले. त्यांनतर काही कामानिमित्त त्यांनी घरी पत्नी रेवतीला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल कोणी रिसिव्ह करत नसल्याने संदीप यांनी शेजाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन पहिले असता घराचा दरवाजा बंद असल्याने कोणी उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी संदीप यांना याबाबत माहिती दिली. ही घटना काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर संदीप यांनी भोईवाडा पोलिसांना पाचारण केले. नियंत्रण कक्षास देखील कॉल करून कळविण्यात आले. त्यांनतर घटनास्थळी भोईवाडा पोलिसांचे पथक आले. अगोदरच संदीप यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला होता. रेवती यांनी पंख्याला गळफास लावण्याआधी १४ वर्षाच्या शुभम आणि ४ वर्षाच्या रिषाला विष दिले होते. शुभमचा मृतदेह बिछाण्यावर तर रिषाचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या पोलिसांना आढळला. पंख्याला गळफास घेतलेला रेवती यांचा मृतदेह पोलिसांनी पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळी तीन सुसाईट नोट सापडल्या. एक पोलीस, भाऊ आणि तिसरी पतीच्या नावाने मायग्रेनचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलेल्या या तीन सुसाईट नोट पोलिसांना सापडल्या.