जळगावात सहकारचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; पाच हजारांची लाच मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 04:35 PM2022-06-07T16:35:22+5:302022-06-07T16:35:31+5:30
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केलेले होते.
जळगाव - घराच्या ताबा पावतीसाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या दोन सहकार अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. विजय सुरेशचंद्र गोसावी (वय ५४, रा.आशाबाबा नगर, जळगाव) व चेतन सुधाकर राणे (वय ४५, रा. गणेश कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केलेले होते. या घराची दप्तरी नोंद घेवून त्याबाबतची ताबा पावती त्यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सहकार अधिकारी विजय गोसायी व सहायक सहकार अधिकारी चेतन राणे यांची भेट घेतली होती. ही पावती देण्याच्या मोबदल्यात दोघांनी १८ मे रोजी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपअधीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाने लाचेबाबत पडताळणी केली. त्यात मागणी झाल्याचे निष्पन्न झाले, मात्र पैसे स्विकारले नाहीत. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, अशोक अहीरे, हवालदार सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने सापळा लावून मंगळवारी दोघांना त्यांच्या कार्यालयातूनच अटक केली. राणे याची नियुक्ती रावेर येथे आहे, परंतु तो प्रतिनियुक्तीने जळगावात नोकरी करीत आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव तपास करीत आहेत.