उल्हासनगर विलगीकरण केंद्रातून दोन कोरोनाबाधित आरोपींचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:49 AM2020-08-07T11:49:00+5:302020-08-07T11:49:20+5:30
कोरोना संसर्गित आरोपी अनेकांच्या संपर्कात येणार असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगर : पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन कोरोना बाधीत आरोपींनी टेऊराम हॉल विलगीकरन केंद्रातून बुधवारी दुपारी २ वाजता पलायन केले. या प्रकाराने खळबळ उडाली असून बाधीत आरोपींचा शोध हिललाईन पोलिस घेत आहेत.
उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी एका गुन्ह्यात कुणाल पटेल व मुकेश जगताप यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कोरोना चाचणी केली. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर, महापालिकेने उभारलेल्या कॅम्प नं-५ येथील टेऊराम हॉल मधील विलिनीकरण केंद्रात उपचारासाठी पोलिसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान जेवणासाठी त्यांच्या हातातील बेड्या पोलिसांनी काढून टाकल्या. त्यांनी ही संधी साधून टेऊराम हॉलच्या मागच्या भिंतीवरून नाल्यात उडी टाकून धूम ठोकली. कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या आरोपींनी पलायन केल्याने पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
कोरोना संसर्गित आरोपी अनेकांच्या संपर्कात येणार असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना बाधीत आरोपींनी पलायन केल्याची माहिती दुसऱ्या दिवसी माहीत झाल्याने, पोलिस कारभारावर टीका व्यक्त होत आहे. हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांच्या सोबत संपर्क केला असता होऊ शकला नाही. तर पोलिस अंमलदारांनी पलायन केलेल्या आरोपीला अटक झाली नाही. अशी माहिती दिली आहे.