दुबईमध्ये रुग्णालय काढून देण्याच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:49 AM2019-02-28T05:49:10+5:302019-02-28T05:49:14+5:30
डॉक्टर दाम्पत्याला अटक; आरोपी पोलीस कोठडीत
ठाणे : दुबईमध्ये टेस्ट ट्युब बेबीचे रुग्णालय काढून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील डॉक्टर अतुल डोंगरे आणि त्यांच्या पत्नीकडून दोन कोटी १५ लाखांची रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या रंगू रामगोपाल आणि त्याची पत्नी विद्या (दोघेही रा. लोकपुरम, ठाणे) या डॉक्टर दाम्पत्याला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
डॉ. अतुल डोंगरे यांचे ठाण्याच्या देवदयानगर येथे टेस्ट ट्युब बेबी सेंटर (आयव्हीएफ) सेंटर आहे. जून २०१७ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये रंगू आणि विद्या रामगोपाल यांनी डोंगरे दाम्पत्याला दुबईतील जुमेरा १ व्हीला ३३२-१९३८ व्हीलामध्ये आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हे सेंटर उभारण्यासाठी सहकार्य करण्याची हमी देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डॉ. डोंगरे तसेच त्यांच्या भागीदारांकडून आरटीजीएसने एक कोटी दोन लाख रुपये, तर रोखीने एक कोटी १३ लाख रुपये असे दोन कोटी १५ लाख घेतले. त्यानंतर, डॉ. डोंगरे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही दुबईत रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी कोणतीही मदत केली नाही. शिवाय, त्यांचे पैसेही परत केले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. डोंगरे यांनी या प्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने रामगोपाल दाम्पत्याला अटक केली.