क्रिस्टल एमडी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: December 30, 2023 08:57 PM2023-12-30T20:57:06+5:302023-12-30T20:57:14+5:30

क्रिस्टल एमडीपावडरसह सात लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Two Crystal MD Drug Traffickers Arrested; Action by Thane Crime Branch | क्रिस्टल एमडी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

क्रिस्टल एमडी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: क्रिस्टल एमडी अमली पदार्थाची तस्करी करणाºया जयेश प्रदीप कांबळी ऊर्फ गोलू (२५, रा.आंबेडकर रोड, ठाणे ) आणि विघ्नेश विनायक शिर्के उर्फ विघ्न्या (२८, रा. वर्तकनगर, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी दिली. त्यांच्याकडून क्रिस्टल एमडी पावडरसह दोन मोबाईल आणि रोकड असा सात लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाण्यातील जुन्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर दोघेजण अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे आणि जमादार निकम आदींच्या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर सापळा रचून जयेश कांबळी आणि विघ्नेश शिर्के या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. या अंगझडतीमध्ये त्यांच्याजवळ ७८.८ ग्रॅम वजनाचा क्रिस्टल एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ दोन मोबाईल आणि काही रोकड असा मुद्देमाल मिळाला.

या प्रकरणी आरोपींविरूध्द एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी हे अमली पदार्थ कोणाकडून आणले? ते कोणाला त्याची विक्री करणार होते? याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांचे पथक करीत आहे.

Web Title: Two Crystal MD Drug Traffickers Arrested; Action by Thane Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक