नागपुरात मद्यधुंद मोटरसायकलस्वारांची दुचाकीला धडक, दोन तरुण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:39 AM2020-01-28T00:39:32+5:302020-01-28T00:40:54+5:30
मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉईंटजवळ सोमवारी रात्री हा भीषण अपघात घडला.
महेश चिखले आणि राजेंद्र भोयर अशी जखमींची नावे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चिखले आणि भोयर स्कूटरवर जात असताना अत्यंत वेगात आलेल्या यामाहा मोटरसायकलवरील तिघांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. चिखले आणि भोयर दुभाजकाकडे समोर फेकल्या गेल्यावर आरोपीने एकाच्या पायाच्या पंजावरून मोटरसायकल नेली. त्यामुळे त्याचा पंजा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर दारूच्या नशेत असलेले आरोपी बेदरकारपणे तेथून पळून गेले. सोमवारी रात्री १०.४० ते १०.५० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पळून जातानाही आरोपी आरडाओरड करीत होते. दोन तरुण दुभाजकाजवळ गंभीर जखमी पडून दिसल्याने अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. अरुण वाघमारे आणि अन्य सेवाभावी तरुणांनी जखमींना उचलून बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. सक्करदरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा छडा लागला नव्हता. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
खर्ऱ्यासाठी गमावला जीव
खर्रा खायची तलफ एका तरुणाच्या जीवावर बेतली. कुणाल मदनराव बेतवार (वय ३४) असे मृताचे नाव आहे. तो वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या आंबेडकर वॉर्डात राहत होता.
समुद्रपूरच्या सचिन रमेश लाखे (वय ३४) यांच्यासोबत कुणाल नागपुरात आला होता. सोमवारी सकाळी ७.२० वाजता ते महिंद्रा पिकअप बोलेरोने (एमएच ३२/ क्यू ४०६९) ते आले होते. वर्धा मार्गावरील विवेकानंद चौकात सिग्नल बंद असल्याने लाखेने बोलेरो थांबवली. कुणालला खºर्याची तलफ आली. त्यामुळे तो वाहनातून खाली उतरला. नेमक्या त्याचवेळी सिग्नल सुरू झाल्याने एका ट्रकचालकाने जोरात वाहन दामटले आणि कुणालला धडक मारून त्याचा बळी घेतला. या अपघातामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. माहिती कळताच धंतोली पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी लाखेंच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.