माहिती अधिकाराचा गैरवापर करणारे दोघे खंडणी स्वीकारताना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:34 PM2019-09-14T18:34:06+5:302019-09-14T18:36:26+5:30
एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघांना अटक
गंगाखेड: माहिती अधिकाराचा गैरवापर करून खंडणी स्वीकारणाऱ्या दोघांना गंगाखेड पोलिसांनी सापळा रचून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. आरोपींनी पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.
गंगाखेड येथील शासकीय धान्याच्या गोडाऊनचे तत्कालीन गोदामपाल गणेश उत्तमराव चव्हाण यांची बदली झाली. जून २०१८ या महिन्यात आश्रम शाळा योजनेतील धान्य पुरवठा वाहतुक परवाना व एच रजिस्टर तसेच परमिट गहाळ झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. दरम्यान, चाचण यांनी नवीन गोदामपाल मुंडे यांच्याकडे पदभार सोपविला. त्यानंतर माहिती अधिकाराच्या माध्यमातून पालम येथील सुदाम भिवाजी लोंढे यांनी गहाळ झालेल्या कालावधीतील एच रजिस्टरची मागणी केली. ही माहिती गणेश चव्हाण यांना कार्यालयातून समजली असता त्यांनी एच रजिस्टरचा पुन्हा शोध घेतला असता ते आढळून आले नाही.
दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी व हरवलेले एच रजिस्टर परत देण्यासाठी लोंढे यांच्यातर्फे प्रभू बालाजी राठोड यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधत प्रथम पाच व नंतर तीन लाख रुपयांची मागणी केली. गोदामपाल चव्हाण जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी याचा तपास करून पुढील कार्यवाही करण्याबाबत गंगाखेड पोलीस स्थानकास पत्र दिले. तपास सुरू असतानाच एच रजिस्टर व आश्रम शाळा धान्य पुरवठ्या संदर्भात कसलीही तक्रार करणार नाही व चौकशी थांबविण्यासाठी सुदाम लोंढे, प्रभु राठोड यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
खंडणी देण्याची मानसिकता नसल्याने गणेश चव्हाण यांनी पोलीसांना संपर्क साधून याची माहिती दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले, सपोनि भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, पोना. जोगदंड, प्रविण कांबळे, पो.शि. राजकुमार बंडेवाड, विष्णु वाघ यांनी सरकारी पंच सोबत घेऊन दि. १३ सप्टेंबर शुक्रवार रोजी सापळा लावून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या हॉटेलवर एक लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम स्वीकारताना सुदाम भिवाजी लोंढे ( रा. पालम ) व प्रभु बालाजी राठोड ( रा. चाटोरी ता. पालम ह.मु. व्यंकटेश नगर गंगाखेड ) या दोघांना रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री उशीराने त्यांच्याविरुध्द शासकीय गोदामातील रजिस्टरची चोरी करून माहिती अधिकाराचा गैरवापर करीत खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, पो.ना. निलेश जाधव हे करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.