अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जखमी; मुळशी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 22:40 IST2020-08-08T22:38:55+5:302020-08-08T22:40:19+5:30
अपघातानंतर वाहनचालक फरार..

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जखमी; मुळशी तालुक्यातील घटना
पिंपरी : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक व एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तसेच एक दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. मुळशी तालुक्यातील तापकरी वस्ती, सूस रोड येथे गुरुवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
लक्ष्मण कदम (वय ३४), प्रमिला बनवाली (वय २९) असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. तर आरती लक्ष्मण कदम (वय २६) असे जखमी दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बनवाली रामनाथ पाल (वय ३०, रा. सूस, ता. मुळशी, मूळगाव यादव पारा, खम्हारिया, पोस्ट छत्तौद, ता. तिल्दा, जि. रायपूर, छत्तीसगढ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कदम, त्यांची पत्नी आरती व फिर्यादी यांची पत्नी प्रमिला बनवाली हे दुचाकीवरून सूस गावात खरेदीसाठी जात होते. त्यावेळी आरोपी याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक लक्ष्मण कदम व फिर्यादी यांची पत्नी प्रमिला बनवाली यांचा मृत्यू झाला. तर आरती कदम यात गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.