५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’च्या दोन संचालकांना अटक; सीआयडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 05:36 PM2020-09-10T17:36:49+5:302020-09-10T17:43:24+5:30
गुंतवणुकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून या कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
पुणे : 'समृद्ध जीवन फूडस इंडिया' कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) गेल्या ५ वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संचालकांना अटक केली आहे.
ऋषीकेश वसंत कणसे (वय ३०) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय ३६, रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीने ३ हजार ७०० कोटी रुपयांची फसवणुक केली आहे. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
समृद्ध जीवन फूडस इंडिया व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पजच्या को़ ऑप़सोसायटी कपंनीच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात राज्यात ४ गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहेत. या कंपन्यांविरोधात देशातील अनेक राज्यात गुन्हे दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून हे संचालक फरार होते. कंपनीने पशुधन विक्री, संगोपन व खरेदी पुन्हा खरेदी यासारख्या विविध आकर्षक, उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणुक योजना सुरु केल्या. त्याकरीता प्रचंड कमिशनवर एजंटची (१२ टक्के) नेमणूका केल्या. विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले. गुंतवणुकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी आहेत़ त्यात मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार, विशाल चौधरी व इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासात या कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गैर बँकिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीआयडीकडे तपासाला असलेल्या ४ ही गुन्ह्यात दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी ही कामगिरी केली.
़़़़़़़़़़
३ हजार ७०० कोटींची फसवणूक
समृद्ध जीवन फूडस इंडिया या महेश मोतेवार यांच्या कंपनीने देशभरातील विविध राज्यांमध्ये कमिशन एजंट नेमून त्यांच्याकडून गुंतवणुकदार/ ठेवीदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधींच्या ठेवी स्वीकारल्या व कोणतीही रक्कम परत न करता अंदाजे ३ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २३३ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आरोपीकडून इतर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.