दोघा मद्यपींनी सेवानिवृत्त सैनिकाला भोसकले; नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरा खून
By अझहर शेख | Published: November 27, 2023 10:56 PM2023-11-27T22:56:45+5:302023-11-27T22:57:19+5:30
म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ दोघे संशयित मद्यपी रस्त्यावर उभे राहून धिंगाणा घालत होते. ये-जा करणारी वाहने अडवून त्यांना दमबाजी करत होते.
नाशिक : शहरात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाले असून सोमवारी (दि.२७) लुटमारीच्या इराद्याने दोघा मद्यपींनी एका सेवानिवृत्त सैनिकाला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांसमोर धारधार शस्त्राने भोसकल्याची घटना म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविदत्त राजेंद्र चौबे (४७,रा. मेट होस्टेल, निशांत गार्डन, धात्रकफाटा) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना पाठलाग करून तत्काळ ताब्यात घेतले.
म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ दोघे संशयित मद्यपी रस्त्यावर उभे राहून धिंगाणा घालत होते. ये-जा करणारी वाहने अडवून त्यांना दमबाजी करत होते. याचवेळी चौबे हे त्यांच्या मोटारीने कुटुंबीयांसोबत या रस्त्याने मार्गस्थ होत असताना त्यांच्यासमोर या मद्यपींनी अन्य वाहनांच्या काच दगडाने फोडली. ते बघून त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला उभी करून त्या संशयितांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी अंधाराचा फायदा घेत ते काही अंतर पुढे पळाले, यावेळी झालेल्या झटापटीत संशयितांनी त्यांच्याजवळील धारधार शस्त्राने चौबे यांच्या छातीत भोसकले. घाव खोलवर लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ते कोसळले. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत चौबे यांना पोलिस वाहनातून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. त्वरित त्यांचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वायुसेनेचे सेवानिवृत्त सैनिक
भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले रविदत्त चौबे हे धात्रकफाटा येथे मुलामुलींच्या मेट वसतिगृहाचे मुख्य वॉर्डन म्हणून नोकरीला होते. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक झालेल्या खुनी हल्ल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसह अन्य कर्मचारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.