खोटे लग्न लावून फसवणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; कोल्हापूर, सांगलीच्या आठ जणांना अटक 

By घनशाम नवाथे | Updated: December 9, 2024 21:26 IST2024-12-09T21:26:17+5:302024-12-09T21:26:30+5:30

सांगलीतील कृष्णा सुभाष जाधव (वय ३५, रा. पंचशीलनगर, मेंडगुले प्लॉट, सांगली) याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Two fake marriage gangs busted; Eight persons arrested from Kolhapur, Sangli  | खोटे लग्न लावून फसवणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; कोल्हापूर, सांगलीच्या आठ जणांना अटक 

खोटे लग्न लावून फसवणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; कोल्हापूर, सांगलीच्या आठ जणांना अटक 

- घनशाम नवाथे

सांगली : खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या दोन टोळ्यांचा सांगलीतील संजयनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. एक गुन्हा संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल असून, दुसरा गुन्हा पाटोदा (जि. बीड) पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आठजणांना अटक करण्यात आली आहे.

सांगलीतील कृष्णा सुभाष जाधव (वय ३५, रा. पंचशीलनगर, मेंडगुले प्लॉट, सांगली) याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित पल्लवी मंदार कदम तथा मूळ नाव परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वेस्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर, सांगली), राधिका रतन लोंढे (रा. न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) यांना अटक केली आहे, तर नाईक नामक महिला (रा. कलानगर, सांगली) हिचा शोध सुरू आहे.

दीपक वैजनाथ भोसले (वय २६, रा. आनपटवाडी, ता. पाटोदा) याचीही अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या काजल सागर पाटील तथा करिष्मा हसन सय्यद (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर), एजंट सारिका दीपक सुळे (रा. आरवाडे पार्क, सांगली), अजित आप्पा खरात (रा. वानलेसवाडी, सांगली), कमल अनिल जाधव (रा. अहिल्यानगर, सांगली) या चौघांना अटक केली. या चौघांना पाटोदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संजयनगरचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे म्हणाले, सांगलीतील पंचशीलनगर येथील कृष्णा जाधव याचे लग्न लवकर जमत नव्हते. सप्टेंबर २०२४मध्ये पंचशीलनगर परिसरातील एजंट महिला संपर्कात आल्या होत्या. त्यांनी लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले. परवीन मुजावर हिचे लग्न झालेले असताना तसेच पल्लवी मंदार कदम अशी तिची ओळख करून दिली. कृष्णा याला ती पसंत पडली. त्याच्यासोबत तिचे दुसरे लग्न लावून दिले. 

याकरिता कृष्णाकडून दीड लाख रुपये घेतले. लग्नानंतर काही दिवसात पल्लवी पसार झाली. चौकशीत कृष्णा याला धक्कादायक माहिती मिळाली. पल्लवी हिचे मूळ नाव परवीन मुजावर असून, तिचे पहिले लग्न मंदार कदम याच्यासमवेत झाल्याचे तसेच एजंट महिलांनी माहिती लपवून ठेवून फसवल्याचे लक्षात आले. तसेच त्यांनी लग्न लावताना घेतलेले दीड लाख रुपये आपापसांत वाटून घेतल्याचे समजले.

कृष्णा याने तातडीने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित पल्लवी कदम तथा परवीन मुजावर आणि एजंट राणी कुंभार यांना अटक केली आहे. त्यानंतर राधिका लोंढे, सुमन वाघमारे या दोघींनाही अटक केली. नाईक नामक महिलेचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना आनपटवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील दीपक वैजनाथ भोसले याचीही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. संजयनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून शून्य क्रमांकाने तो पाटोदा पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. तसेच या गुन्ह्यातील काजल पाटील तथा करिष्मा सय्यद, सारिका सुळे, अजित खरात, कमल जाधव या चौघांना अटक केली. त्यांना पाटोदा पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोघींविरूद्ध तक्रारीसाठी पुढे या
गांधीनगर येथील पल्लवी कदम तथा परवीन मुजावर आणि काजल पाटील तथा करिष्मा सय्यद यांनी अशा प्रकारे लग्न करून आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळी भेट, सायंकाळी लग्न
ज्यांचे लग्न होत नाही, अशांना एजंट गाठतात. सकाळी भेट घडवून आणल्यानंतर दुपारी चर्चा घडवून व्यवहार ठरतो. सायंकाळी थेट लग्न लावूनच मोकळे होतात. एकाच दिवसात हा प्रकार घडतो, अशी माहिती पुढे आली आहे.

Web Title: Two fake marriage gangs busted; Eight persons arrested from Kolhapur, Sangli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.