मुंबईत दोन ठिकाणी भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर पाचजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:44 PM2019-11-27T21:44:38+5:302019-11-27T21:46:56+5:30
कांदिवली येथील अपघातमध्ये एका वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले.
मुंबई - मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. सायन पुलावर भरधाव टेम्पोने तीन दुचाकींना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी जखमी झाले. कांदिवली येथील अपघातमध्ये एका वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले.
सायन पुलावर मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी परवानगी आहे. मात्र मुंबईत येणाऱ्या वाहनांचा लोंढा वाढला तर पुलावरील एक लेन मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सुरु करण्यात येते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास टेम्पोचालक आदेश वानखेडे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो मुंबईकडे येणाऱ्या लेनमधील तीन दुचाकींना जाऊन धडकला. ही धडक इतकी भयंकर होती की, यामुळे दुचाकीवरील सर्वजण दूरवर फेकले गेले. इतर वाहनचालकांनी अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन, खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र अब्दुल आणि खालिदा यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान टेम्पोचालक वानखेडे याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री एका वाहनचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अनिल वाघेला आणि सागर पटेल या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. वाघेला आणि पटेल हे दोघेजण बोरिवली पूर्वेकडील पांडे कंपाउंडमधील रहिवाशी होते. वाघेला आणि पटेल हे घरी परतत असताना हा अपघात घडला. मात्र, त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली याचा शोध समतानगर पोलीस घेत आहेत.