एकाच मुलावर दोघींचा जीव जडला, २०-२५ जण एकमेकांना भिडले; हाणामारी, तोडफोड अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:51 PM2022-09-16T12:51:54+5:302022-09-16T12:54:50+5:30
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते.
कानपूर - शहरात एका युवकासाठी दोन मुलींमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या दोघींनी २०-२५ तरुणांची टोळी बोलावली. बर्राच्या पटेल चौकात दोन्ही गट एकमेकांना भिडले. या मारहाणीत दगडफेकही करण्यात आली. इतकेच नाही तर या झटापटीत पिस्तुलातून गोळीही चालवली परंतु त्यात कुणी जखमी झाले नाही. सध्या पोलिसांनी या दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
बर्रा परिसरात २ मुलींचं एकाच मुलावर प्रेम होते. त्यावरून या दोन्ही मुली एकमेकींविरोधात खुन्नस काढत होत्या. बुधवारी रात्री प्रियकरावरून दोन्ही प्रेयसी एकमेकांना धमकावू लागल्या. रात्री उशिरा पटेल चौकात दोन्ही गटाकडून २०-२५ युवक कार-बाईक घेऊन पोहचले. यावेळी वातावरण चांगलेच पेटले. दोन्ही गटात मारामारी झाली. त्यात ३ कारची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत सगळेच पसार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय पांडे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परिसरातील पेट्रोल पंपावर लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. या प्रकरणी युवतीने प्रियकरावर बर्थडे पार्टीत कोल्ड ड्रिंक्स देत त्यात नशेचं औषध पाजल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेची पोलीस चौकशी होत आहे. लवकरच दोषींवर योग्य ती कारवाई करू असं त्यांनी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
बर्रा परिसरात २ युवतींमध्ये एका युवकावरून भांडण झाले. या दोघींनी एकमेकींना धमक्या दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा पटेल चौकात दोन्ही बाजूचे युवक मोठ्या संख्येने जमले. त्यावेळी स्कॉर्पिओ, क्रेटा आणि ५-६ बाईक्सने युवक पोहचले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. त्यात क्रेटा कारची युवकांनी तोडफोड केली. एकाने पिस्तुल काढून गोळीबार केला परंतु ती गोळी कुणाला लागली नाही. तर दुसऱ्या युवकाने पिस्तुलानेच युवकाच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते.