खार येथे दोन मुलींचा विनयभंग; आरोपीस अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:59 AM2024-08-22T05:59:02+5:302024-08-22T05:59:12+5:30
या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून उसळलेला जनक्षोभ शमला नसताना मुंबईतही दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला आहे. खार येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला बुधवारी अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
पीडित मुली ६ आणि १२ वर्षे वयाच्या आहेत. खारदांडा परिसरात त्या राहतात. त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी व्यसनी असल्यामुळे त्याला कुटुंबीयांनी पुनर्वसन केंद्रात पाठवले होते. तेथून तो नुकताच परतला होता.
मारण्याची भीती दाखवून चाळे
आरोपी गेल्या आठवड्यापासून या मुलींना त्रास देत होता. मंगळवारी त्याने ६ वर्षीय मुलीच्या कानाला धरून वर उचलले, तर दुसऱ्या मुलीचा हात पकडून तिला मारण्याची भीती दाखवून तो स्वतः विवस्त्र होत होता. घाबरलेल्या मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांनी पोलिस ठाणे गाठले.