रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी दोन गट भिडले; मध्यस्थ नगरसेवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:08 PM2019-12-17T14:08:41+5:302019-12-17T14:12:00+5:30
सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.
औंढा नागनाथ : येथे जुन्या व नवीन बसस्थानक परिसरात सध्या नवीन रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात एका नगरसेवकासह पाच जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात घडली.
औंढा नागनाथ येथे आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने दिवसभर तणावाची परिस्थिती होती. त्यातच सायंकाळी सातच्या सुमारास जुन्या बसस्थानकापासून गावामध्ये जाणाऱ्या कमानीजवळ अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये एक फूलवाला हुतात्मा स्तंभाच्या जवळ दुकान टाकत असल्याने त्यास याठिकाणी जुने अतिक्रमण असलेल्या अर्जुन जाधव यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. ही घटना सोडविण्यासाठी गेलेल्या नगरसेवक विष्णू जाधव यांनाही यावेळी दुखापत झाली आहे.
या घटनेमध्ये शेख रौफ शेख बशीर, शेख रहीम, गणेश जाधव, भीमराव जाधव व नगरसेवक विष्णू जाधव हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. शहरातील तणावाची स्थिती पाहता जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
यादरम्यान पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दोन समाजात निर्माण होणारा वाद संपुष्टात आला आहे. या घटनेनंतर शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करून झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु सध्या जरी वाद मिटला असला उद्या काय होते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे
विश्रामगृह ते कृउबा पर्यंत रस्ता रूंदीकरण
औंढा येथे सध्या विश्रामगृह ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु यापूर्वीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक हीे स्वत:ची जागा असल्याचे समजून वषार्नुवर्षे त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. ४ रुंदीकरण कामात अनेकांची दुकाने उठली आहेत. परंतु नव्याने या रस्त्यालगत झालेल्या नालीचा आधार घेऊन काही फुटकळ व्यापारी सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आहेत.