घोषणाबाजीवरुन दोन गट भिडले! दगडफेकीत दोन जखमी, ५० जणांविरुद्ध गुन्हा
By संजय पाटील | Published: October 9, 2022 11:22 PM2022-10-09T23:22:56+5:302022-10-09T23:22:56+5:30
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती आणली नियंत्रणात
संजय पाटील, अंमळनेर (जि. जळगाव): दुचाकीवर आलेल्या तरुणांनी घोषणाबाजी केल्याच्या कारणावरुन दोन गटात दंगल उसळली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील झामी चौकात शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, झामी चौक भागात शनिवारी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास ३० ते ३५ जण मोटार सायकलवर मोठ्याने हॉर्न वाजवत आले. तिथे त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी भाजीपाला विक्रेते सचिन अशोक महाजन (२५) यांच्यासह काही जणांनी आरडाओरड का करत आहात, याबाबत विचारले. त्यावर या लोकांनी दगडफेक करत शिवीगाळ केली. यात सचिन महाजन व मनोज महाजन हे दोन जण जखमी झाले. यावेळी काही जण मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांना दगडांचा मार बसला. यातून महिलाही सुटल्या नाहीत.
सचिन महाजन यांनी फिर्यादी दिली. यावरुन नावीद शेख, नइम पठाण, गुलाब नबी, साहील आणि अन्य ३० ते ३५ जण (सर्व रा. झामी चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातर्फे इम्रान अन्सारी यांनी फिर्याद दिली. त्यांचे सायकल दुकान व शेजारील फर्निचर दुकानाची तोडफोड करण्यात आली. यात या दुकानांचे सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावरुन विशाल चौधरी, मनोज ठाकरे, दीपक पाटील, महेश केबलवाला, अजय नाथबुवा यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींवर पुढील काळातही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, असे प्रवीण मुंढे (जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव) म्हणाले.