अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर
By नितिन गव्हाळे | Published: May 14, 2023 07:25 AM2023-05-14T07:25:28+5:302023-05-14T07:27:27+5:30
रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात दाेन गटांत शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास वाद झाल्याने त्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर काही लाेकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला. यावेळी एका गटाने तुफान दगडफेक करीत माेटारसायकलींचीही माेठ्या प्रमाणात ताेडफाेड केली, तर काही समाजकंटकांनी एक घर पेटवून दिले. यासाेबतच समाजकंटकांनी अनेक ठिकाणी जाळपाेळ केली. रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला. या घटनेत शैला नामक एक महिला पोलीस कर्मचारी हिच्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने ताेडफाेड व दगडफेक सुरू केल्याने दाेन गटांत वाद झाला व परस्परांवर जमाव चालून गेल्याने एकच धावपळ उडाली. यानंतर घटनास्थळावर जिल्हा पाेलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह शहरातील सर्वच पाेलिस ठाण्यांचे ठाणेदार व पाेलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रणधीर सावरकर जुने शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती येथून पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या पाचरण करण्यात आल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल यांनीदेखील फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात कुचकामी ठरलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घटनास्थळावर जिल्हा पाेलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलिस अधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार वसंत खंडेलवाल, जुने शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकीराेडचे ठाणेदार शिरिष खंडारे आदी पाेलिस अधिकारी परिस्थितीवर रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेवून हाेते.
अफवांवर विश्वास ठेवू नका-देवेंद्र फडणवीस
अकोला शहरात दोन गटात घडलेल्या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून माहिती घेतली असून यासंदर्भात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच अकोले कर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, सामंजस्य व सलोखा कायम राखावा असे आव्हानही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.