धक्कादायक! मैत्रिणीच्या डिमांड संपत नव्हत्या; वैतागलेल्या मित्रानं तिलाच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 04:16 PM2022-02-05T16:16:21+5:302022-02-05T16:18:07+5:30
सांताक्रूझमधील तरुणीची पालघरला नेऊन हत्या; विलेपार्लेतील मित्राच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुंबई: सांताक्रूझमधुन बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या पिंकीच्या नेहमीच्या डिमांडचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता. पिकींच्या मागण्या संपत नव्हत्या म्हणून कंटाळून तिलाच संपवले असे त्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ मधील अधिकाऱ्यांना सांगितले असून या प्रकारामुळे सांताक्रूझमध्ये खळबळ उडाली आहे.
सदर तरुणी २४ डिसेंबर, २०२१ पासून बेपत्ता झाल्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याबाबत नोंद करण्यात आली होती. त्यानुसार सांताक्रूझ पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ चे अधिकारी देखील याचा तांत्रिक तपास करत होते. ज्यात पिंकीचा एक मित्र असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यासाठी त्यांनी झिकोला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिको सुरुवातीला काहीच माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानेच तिची हत्या केल्याची कबुली दिली.
पिंकी त्याची जुनी मैत्रीण होती. मात्र ती नेहमी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू तसेच बाहेर फिरायला नेण्याची मागणी करत होती. त्यामुळे तो वैतागला होता. झिकोचे अन्य मुलीवर प्रेम असल्याने अखेर पिंकीचा त्रास कायमचा संपवायचा असे त्याने ठरवले. त्यानुसार एका स्कुटीवरुन दोघे पालघरला फिरायला गेले. जिथे तिच्या वागण्यावरुन, भेटायला बोलावण्यावरुन त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर झिकोने २४ डिसेंबरच्याच रात्री त्याच्या अन्य एका मित्राच्या (कुमार) मदतीने पिंकीला जेट्टी परिसरात असलेल्या डोंगराळ भागात धक्का दिला. तेव्हा ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर झिकोने त्याची स्कुटी कुमारला घेऊन जाण्यास सांगत अन्य मित्रांसोबत ट्रिपल सीट तो घरी परतला.
झिकोच्या कबुलीनंतर आरोपीला अधिक तपासासाठी कक्ष ९ ने पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, नाळे, सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र पाटील आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आला. झिकोला मदत करणाऱ्या त्याच्या कुमार नामक साथीदाराला पालघर पोलिसांनी विरारमधून अटक केली आहे. गुरुवारी पिंकीचा पूर्णपणे कुजलेला आणि गळ्यात दगड बांधलेला मृतदेह पालघर जिल्ह्यातील विकसनशील जेट्टीजवळ मिळाला होता.