बदलापूरात माथाडी संघटनेच्या पदाधिका-यावर दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:56 PM2018-10-02T16:56:12+5:302018-10-02T16:56:12+5:30
बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात सकाळी दहाच्या सुमारास जगदिश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेले दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
बदलापूर- गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. मात्र सुदैवाने हल्लोखारांचे पिस्तुल न चालल्याने कुडेकर बचावला. मात्र यावेळी एक गोळी हवेत चालल्याने आसपासचा परिसरातील नागरिकांत एकच खळबळ उडाली.
तीन वर्षांपूर्वीच्या हत्या आणि गोळीबाराच्या प्रकरणानंतर बदलापूर शहरात शांततेचे वातावरण होते. या वातावरणाला मंगळवारी अचानक गालबोट लागले. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात सकाळी दहाच्या सुमारास जगदिश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेले दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुल न चालल्याने त्यांचा डाव फसला. यावेळी कुडेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने ते रमेशवाडीक़डे निघून गेले. मात्र काही सेकंदात ते पुन्हा कुडेकर यांच्याकडे आले आणि पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळीही गोळी सुटली नाही. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. त्यामुळे कुडेकर थोडक्यात बचावला. याची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. जगदीश कुडेकर हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे. टोळी युध्दातुन हा प्रकार घडल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करणारे आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहे. दोघांनीही हेल्मेट झातल्याने त्यांची ओळख पटणो अवघड जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.