दिघीत दरोड्याच्या तयारीतील पाच जणांकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:43 PM2019-03-28T13:43:54+5:302019-03-28T13:44:58+5:30
निवडणूक विभागातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी करण्यात येत आहे
पिंपरी : दिघी येथे दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मॅग्झिन चौकात बुधवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अशी तपासणी करत असताना भरारी पथकास संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार चाकीचा चालक केशव लक्ष्मण सूर्यवंशी (वय २४ , रा.खंडोबामाळ, नारायणनगर, फुरसुंगी, पुणे), मनोज आत्माराम थिटे (वय २८ , रा. हडपसर, पुणे) रणजित शरदचंद्र लोखंडे (वय २४ , रा. दत्त मंदिराजवळ, हडपसर, पुणे), आकाश सीताराम चव्हाण (वय २७ , रा. करंजपेठ, सातारा), भागवत लिंबाजी कुंभारे (वय १९ , रा. नारायणनगर, खंडोबामाळ, फुरसुंगी, पुणे) यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
निवडणूक विभागातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी करण्यात येत आहे. भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी आळंदी -भोसरी रस्त्यावरून पांढ-या रंगाची चारचाकी (एमएच ०४. ईक्यू. १४८६) पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. पथकातील कर्मचा-यांना संशय आल्याने त्यांनी चारचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारचाकी थांबली नाही. त्यामुळे पथकाने अन्य सहका-यांच्या मदतीने चारचाकीला चौकात अडविले. चारचाकीत चालकासह पाच जण होते. त्यांचा संशय आल्याने पथकाने दिघी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार दिघी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चारचाकीतील पाचजणांची चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे, लोंखंडी रॉड, लाकडी दांडके, मिरची पुड, सुरी, नायलॉन दोरी असा माल मिळून आला.
भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक विभागातील भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र टिके, भाऊसाहेब पाटील, आनंद कापुरे, सुभाष डमाळ, दिलीप खंदारे, पोलीस नाईक दिपाली सुरकुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन राउळ, सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे आदींनी कारवाई केली.