दोनशे पत्रकांतून झाला हत्येचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:36 PM2019-03-28T20:36:55+5:302019-03-28T20:40:14+5:30
मृतदेहाची ओळख पटवत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
मुंबई - वाडीबंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा डोंगरी पोलिसांनी केला. हाती कुठलेही पुरावे नसताना, अंगकाठीवरून तो कामगार असल्याच्या शक्यतेतून मृतदेहाचे फोटो आणि वर्णनाची दोनशे पत्रके मुंबईतील प्रमुख ठिकाणी लावली. यातूनच मृतदेहाची ओळख पटवत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
२५ मार्चला रात्रीच्या सुमारास ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. अंगकाठीवरून तो मजूर असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर भागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे आणि तपास पथकाने शोध सुरू केला. मृतदेहाचा फोटो आणि वर्णनाची दोनशे पत्रके छापून मजूर मोठ्या प्रमाणात असतात तेथे लावली. तपासाअंती पथकाने त्याची ओळख पटवली. अब्दुल रेहमान असे त्याचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी असल्याचे समजले. दारू पिताना झालेल्या भांडणातून मित्र शिवानंद बसवराज कटनळळी उर्फ शिवा उर्फ राज (३५), राजा यांनी त्याला जिवे मारल्याचे निष्पन्न झाले. शिवानंदला पोलिसांनी अटक केली. तर राजालाही रात्री उशिरापर्यंत अटक होईल, असे डोंगरी पोलिसांनी सांगितले.