वाळू व्यावसायिकाच्या खून प्रकरणात दोघांना सात दिवस पोलीस कोठडी
By सागर दुबे | Published: August 26, 2022 09:26 PM2022-08-26T21:26:57+5:302022-08-26T21:28:54+5:30
शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव: वाळू व्यावसायिक भावेश उत्तम पाटील (३२,रा. निवृत्तीनगर) या तरूणाच्या खून प्रकरणी दोन्ही संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती दोघांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
वाळू व्यावसायिक भावेश पाटील याचा मंगळवारी भूषण सपकाळे (३२,रा.खेडी खुर्द) व मनिष पाटील (२२, रा.आव्हाणे) यांनी खून केला होता. या घटनेनंतर दोघांनी पलायन केले होते. दरम्यान, गुन्ह्यात दोघांचे नाव निष्पन्न झाल्यावर पोलिसांचे पथक सुध्दा दोघांच्या मागावर होते. अखेर गुरूवारी सकाळी पोलिसांनी दोघांच्या मुंबई-पुणे महामार्गावर मुसक्या आवळल्या होत्या.
शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांची कसून चौकशी सुरू असून शुक्रवारी सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी सुध्दा गुन्ह्यासंबंधित कागदपत्रांची पाहणी केली.