पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांची घरं फोडणारे दोन आंतरजिल्हा चोरटे पकडले!
By विलास जळकोटकर | Published: January 12, 2024 08:31 PM2024-01-12T20:31:31+5:302024-01-12T20:31:40+5:30
दागिन्यांसह रोकड जप्त : पुन्हा चोरीसाठी आले अन् सापडले
सोलापूर : विजापूर रोड परिसरातील महिला पोलीस अधिकारी आणि आणखी एका परगावी गेलेल्यांचे घर फोडून एकूण ६ लाख ३७ हजार रुपयांची दागिने व रोकड चोरणारा आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारास गुन्हेशाखेच्या पथकाने जुना विजापूर नाका कंबर तलावा परिसरात अटक केली. ते पुन्हा चोरीसाठी आल्यानतर त्याला सापळा लावून पकडले. मोहन दौलतराव मुंडे व सोहेल शेख (दोघे रा. अंबाजोगाई) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या घरातील चोरी आणि सुरज पाटील यांच्या घरात झालेल्या चोरींबद्दल तांत्रिक माहितीच्या आधारे विश्लेषण केले. यात हा गुन्हा रेकार्डवरील गुन्हेगार मोहन दौलतराव मुंडे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यानं केल्याचा निष्कर्ष काढला.
त्यानंतर ६ जानेवारी रोजी सपोनि दादासो मोरे यांच्या तपास पथकातील इम्रान जमादार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यात संबंधित गुन्हेगार व त्याचा साथीदार पुन्हा घरफोड्या करण्यासाठी जुना विजापूर नाका कंबर तलाव परिसरात भिंतीजवळ बसल्याची खबर मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून मोहन मुंडे व सोहेल जलील शेख (वय- २०, रा. करबेला वेस, अंबाजोगाई) या दोघांना अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, फौजदार अल्फाज शेख व पथकातील संदीप जावळे, विनोद रजपूत, इम्रान जमादार, राजकुमार पवार, बापू साठे, सुभाष मुंडे, सतीश काटे, बाळासाहेब काळे,सायबरचे अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, वसीम शेख, इब्राहिम शेख यांनी केली.
दोन्ही गुन्ह्याची दिली कबुली
अटक केलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांकडून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या घरातून ६ लाख रुपयांचे १२ तोळे दागिने व १२ हजार रुपये रोकड आणि सुरज पाटील यांच्या घरातून चोरलेले दागिने व रोख रक्कम असा ६ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी गुन्ह्याची कबूली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी सांगितले.