नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू : संतप्त जमावाने ट्रेलर पेटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:10 PM2020-01-06T23:10:43+5:302020-01-06T23:12:41+5:30
पल्सरवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना भरधाव ट्रकचालकाने मागून धडक मारली. अपघात झाल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरवरील तरुणांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पल्सरवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना भरधाव ट्रकचालकाने मागून धडक मारली. अपघात झाल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरवरील तरुणांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली उड्डाणपुलावर रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने घटनास्थळी उभा असलेला एक ट्रेलर पेटवून दिला तर, जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
विनोबा भावेनगरातील रहिवासी देवलाल रुमलाल शाहू त्याचे मित्र कमलेश संतोष महामल्ला (वय २०) आणि रोहित आनंद काटेकर (वय २६) यांच्यासह पल्सरवर बसून रविवारी रात्री घराकडे येत होते. चिखली उड्डाणपुलावर विटाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर आरजे ०७/ जेबी ५०८५ च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून देवलाल शाहूच्या पल्सरला मागून जोरदार धडक मारली. अपघात घडल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरला तसेच खेचत पुढे नेले. त्यामुळे देवलाल शाहू आणि कमलेश महामल्लाचा जागीच मृत्यू झाला तर रोहित काटेकर गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील तसेच परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी तेथे तोडफोड सुरू केली. बाजूला असलेल्या एमएच २७/ डीएक्स २७५२ क्रमांकाचा नादुरुस्त ट्रेलर उभा होता. त्याला संतप्त जमावाने पेटवून दिले. दरम्यान, माहिती कळाल्यानंतर कळमना पोलीस तेथे पोहचले. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तणावात जास्तच भर पडली. माहिती कळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. याप्रकरणी देवलाल शाहूचे मोठे बंधू खेमलाल रुमलाल शाहू (वय ३०, रा. विनोबा भावेनगर) यांची तक्रार नोंदवून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
परिसरात शोककळा
देवलाल यांच्यापरिवारात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी सुभद्रा तसेच राधे, संजू, रुही नामक मुले आहेत. तोच घरातील कमावता होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कमलेश त्याचे आजोबा आणि काकांसोबत राहायचा. या दोघांच्या मृत्यूने विनोबा भावेनगरात तीव्र शोककळा पसरली आहे.
जमावावरही गुन्हे दाखल
कळमना मार्केटमध्ये ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नेहमी अवजड वाहने येतात. परप्रांतातून येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असतो. त्यामुळे कळमना, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच अपघात घडतात. कळमन्यात तर दिवसभरात अनेकदा ठिकठिकाणी जाम लागतो. हा धोकादायक प्रकार कळमना पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रविवारी रात्री अपघातानंतर जमावाने कळमना पोलिसांचा जोरदार निषेध केला. परिणामी कळमना पोलिसांनी दोषी ट्रकचालकासोबतच ट्रेलर पेटवून देणाऱ्या तसेच पोलिसांना विरोध करणाऱ्या जमावाविरुद्धही विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. पोलिसांनी लाठीमाराचा मात्र इन्कार केला आहे.