कात्रज येथे कॉलेज कॅटिंनच्या दोन कामगार मुलांचे सापडले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:40 AM2019-03-07T11:40:58+5:302019-03-07T11:49:32+5:30
आमच्या मुलांचा मृत्यु पेस्ट कंट्रोलने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत मुलांपैकी एकाच्या हाताला जखम झाली होती.
पुणे : कात्रज येथील पी़ आय़ कॉलेजच्या कँटिनमध्ये काम करणारे दोघे जण त्यांच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अजय राजू बेलदार (वय२०, रा. जळगाव) आणि अनंता खेडकर (वय २०, रा. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत़. प्राथमिक तपासात पेस्ट कंट्रोलमुळे दोघांचा मृत्यु झाल्याची माहिती पुढे आली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
कात्रज येथील पी़ आय कॉलेजच्या कॅटिनमध्ये हे दोघेही गेल्या एक वषार्पासून काम करतात. कॉलेजच्या कॅटिनमध्ये काम केल्यावर दोघे जण त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दोघेही कामाला न आल्याने कॅटिनचा मॅनेजर त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेला. दार वाजवूनही ते उघडल्याने त्यांनी मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती दोघांच्याही नातेवाईकांना देण्यात आली. त्याचे नातेवाईक आज सकाळी पुण्यात आले. आमच्या मुलांचा मृत्यु पेस्ट कंट्रोलने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यातील एकाच्या हाताला जखम झाली होती.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले की, दोघेही एकाच खोलीत रहात होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी ढेकूण मारण्याचे औषध खोलीत फवारले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी ते मित्रांच्या खोलीवर जाऊन राहिले होते. एक दिवसानंतर ते आपल्या खोलीवर झोपायला गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्या खोलीत झोपले. पण, खोली पूर्णपणे बंद असल्याने श्वास गुदमरुन व विषारी औषधाच्या वासाने त्यांचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
आम्ही खोलीची पाहणी केल्यावर त्या खोलीत अजूनही वास येत होता. तेथे काही पालीही मरुन पडल्या होत्या. त्यांनी अगदी खिडक्यांना टेप लावून त्या बंद केल्या होत्या. कॅटिनच्या मॅनेजरने खिडकीतील पाण्याची बाटली त्यांच्या अंगावर टाकून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. पण ते न उठल्याने त्यांनी खिडकी तोडली. खिडकीचे ग्रील तोडून काढताना त्याचा काचा तुटल्या. त्या खिडकी खालीच ते दोघे झोपले होते. खिडकीची काच पडल्याने त्यांच्यातील एकाच्या हाताला जखम झाली असावी.
नातेवाईकांच्या उपस्थितीत आज दोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यातून मृत्युचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.