दोन लाख घेऊन सहा लाखांच्या दिल्या नकली नोटा; तीनपट पैशांचे दाखविले आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:14 AM2022-03-22T10:14:48+5:302022-03-22T10:15:24+5:30
Crime News : या घटनेप्रकरणी चार दिवसांनंतर सोमवारी भैय्या महाजन (रा. भडगाव) याच्यासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : तीनपट पैसे देण्याचे आमिष दाखवून नथ्थू काशिनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर-फागणे, ता. जि. धुळे) यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन त्या बदल्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या सहा लाखांच्या नोटा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १८ मार्च रोजी अजिंठा चौकात घडलेल्या या घटनेप्रकरणी चार दिवसांनंतर सोमवारी भैय्या महाजन (रा. भडगाव) याच्यासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नथ्थू कोळी हे चालक म्हणून काम करतात. २६ फेब्रुवारी रोजी मित्र वाल्मीक शिवाजी पाटील हा कोळी यांच्याकडे आला. पैसे तिप्पट करणाऱ्या व्यक्तीची माहिती भडगावचा शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक भैय्या महाजन याच्याकडे आहे, असे सांगितले. त्यानंतर १५ दिवसांनी पाटील याने फागण्याच्या पेट्रोल पंपाजवळ भैय्या महाजन याची भेट घालून दिली. तेव्हा त्याने तिप्पट पैसे करून देणारा माणूस माझा ओळखीचा आहे, असे सांगून कोळी यांच्याकडून १० हजार रुपये घेतले. त्या बदल्यात ३० हजार रुपये आणून देतो, असेही आमिष त्याने दाखविले.
भुसावळला केली नोटांची खात्री
१४ मार्च रोजी एका व्यक्तीने कोळी यांना फोन करून तुमचा नंबर भैय्या महाजन याने दिला असून पैशाबाबत सांगितले आहे, असे बोलून फोन कट केला. त्यानंतर कोळी यांनी भैय्या महाजनला फोन केला; परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोळी वाल्मीक याला घेऊन भडगावला गेले. तेथे त्यांची रुग्णालयात भेट झाली. त्याने तिप्पट पैसे करणारा माणूस जळगावला आहे, तुम्ही तेथे जा. तो तुम्हाला काही नोटांचे नमुने दाखवले, असे त्याने सांगितल्याप्रमाणे दोघं जण जळगावात आले.
संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने भुसावळला बोलावले. त्यानुसार कोळी व वाल्मीक पुन्हा भुसावळला गेले. तेथे त्याची भेट झाल्यावर त्याने पाचशे रुपयांच्या दोन, दोनशे रुपयांच्या दोन व शंभराच्या तीन नोटा नमुना म्हणून दाखविल्या. त्या नोटा खऱ्या असल्याची खात्री पटल्यावर दोघं जण घरी परत आले. त्याचदिवशी संध्याकाळी संबंधित व्यक्तीने फोन केला व दोन लाखांपेक्षा कमी रकमेवर तीन पट रक्कम मिळणार नाही, असे सांगून तुम्ही दोन लाख रुपये आणा आणि सहा लाख रुपये घेऊन जा, असे सांगितल्याने १८ मार्च रोजी त्याने पैसे घेऊन बोलावले.